पुणे - समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नातेसंबंधातील एक विचित्र प्रकार समोर आला. मावशीने 18 वर्षांपूर्वी लग्नात गिफ्ट म्हणून दिलेले सोन्याचे दागिने परत मागितल्याने वाद झाला. याच वादातून विवाहितेला मावशीसह इतर नातेवाईकांनी मारहाण करत विनयभंग केला. एका 38 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'किंमत वाढल्याचे पाहूनच मावशीने दागिने परत मागितले'
याप्रकरणी अधिक माहिती अशी. की फिर्यादी या पुण्यातील नाना पेठेत राहत असून तेथेच त्यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी मावशी, मावशीचे पती आणि इतर नातेवाईक आले. यावेळी त्यांनी फिर्यादीला अठरा वर्षांपूर्वी लग्नात गिफ्ट म्हणून दिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या परत मागितल्या. विशेष म्हणजे अठरा वर्षांपूर्वी या बांगड्यांची किंमत 6 हजार रुपये होती. आता त्याची किंमत 30 हजार रुपये इतकी आहे. किंमत वाढल्याचे पाहूनच मावशीने हे दागिने परत मागितले, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
ठाण्यात तीन ज्येष्ठ नागरिकांसह चौघांवर गुन्हा
याच कारणावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद झाला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तर आणखी एका नातेवाईकाने फिर्यादीच्या अंगावरील टॉप काढून तिच्या मनाला लज्जा होईल असे वर्तन केले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात तीन ज्येष्ठ नागरिकांसह चौघांवर विनयभंग, मारहाण व इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.