पुणे - पाडव्यापासून मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत. पुण्यातील सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवस्थानकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दर्शनाच्या रांगेत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन, थर्मामिटरव्दारे टेम्परेचर चेकिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. भाविकही देवस्थानसमितीच्या नियमांचं पालन करत दर्शन घेत आहेत.
मास्क असेल तर भाविकांना मंदिरात प्रवेश-
पुण्यातील सारसबाग येथे सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर असून याला तळ्यातील गणपती असे म्हणतात. प्रत्येक पुणेकरांच आकर्षण असलेल्या या मंदिरात शासनाच्या नियमानुसारच भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. विना मास्क कोणत्याही भक्ताला बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग तसेच देवस्थान समितीने तयार केलेल्या नियमांचं पालन भक्तांना करावं लागणार आहे, अशी माहिती यावेळी विश्वस्त योगेश चव्हाण यांनी दिली.
भाविक म्हणतात...-
सारसबाग उद्यानात येणाऱ्या प्रत्येकजण हे या तळ्यातील बाप्पाचे दर्शन घेतच असतो. दिवाळी म्हटलं की येथील बाप्पाचे दर्शन न होणे हे पुणेकरांना न पचणारे आहे. पाडव्याच्या निमित्त राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने खूप चांगलं वाटतंय. दिवाळी निमित्त दरवर्षी सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतो. यंदाही दर्शन मिळाल्याने खूप आनंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनीच नियमांचं पालन करावं, असं यावेळी भाविकांनी म्हटलं आहे.
यावेळी घेता येणार बाप्पांचे दर्शन-
मंदिर सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. भाविकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करावे, अस आवाहनही देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे.
ससर्वसाधारण दिवसात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असत. पण कोरोनानंतर आता मंदिरे सुरे झाल्याने आणि शासनाच्या नियमावलीने नक्कीच भक्तांच्या गर्दीवर परिणाम होणार आहे. आधी 5 हजारांपर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. आता मात्र ते प्रमाण कमी होणार आहे. असही यावेळी योगेश चव्हाण म्हणाले.
हेही वाचा- दिवाळी पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; दररोज एक हजार भाविकांना लाभ
हेही वाचा- नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ