पुणे - 'शनिवार वाडा' हा केवळ पुण्याच्या प्रमुख आकर्षण नसून, एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळही आहे. शनिवार वाडा, बाजीराव पेशवे आणि मस्तानी यासंदर्भातील इतिहास जवळपास सर्वश्रुत आहे. याच मस्तानीच्या वंशजांनी, काल (सोमवार) या वाड्याला भेट दिली. मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर यांच्या नंतरच्या या पिढ्या आहेत.
मस्तानीच्या आठव्या पिढीचे वंशज, नवाब इरफान अली बहादूर यांनी आपल्या 11 कुटुंबियांसोबत शनिवार वाड्याला भेट दिली. यामधील बरेच लोक हे पहिल्यांदाच पुण्याला आले होते, त्यामुळे पहिल्यांदाच त्यांना या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन लाभले. आतापर्यंत त्यांनी केवळ घरातील वडिलधाऱ्यांकडून, किंवा पुस्तके आणि चित्रपटांच्या माध्यमातूनच आपल्या इतिहासाबाबत जाणून घेतले होेते. मात्र, प्रत्यक्षात ही वास्तू पाहून सर्वांनाच फार आनंद झाला.
मस्तानीच्या वंशजांपैकी बरेचसे लोक हे मध्यप्रदेशमध्ये राहतात. इंदूर, सिल्लोड या शहरांमध्ये त्यांची घरे आहेत. आताही ते एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. ईद सारखे सणही ते एकत्र येऊन साजरे करतात. या पुणे यात्रेमध्ये त्यांनी मस्तानीशी संबंधीत अनेक जागांना भेट दिली. शनिवार वाडा, 'केळकर म्युझिअम'मधील मस्तानी महल या जागा त्यांनी पाहिल्या आहेत. पाबळमधील मस्तानी समाधीलाही ते भेट देणार आहेत.
इरफान अली बहादूर यांनी यावेळी बोलताना, आपल्या पूर्वजांचा खरा इतिहास जाणून घेऊन त्याची पडताळणी करण्यासाठी आपण इथे आल्याचे सांगितले. तसेच, इथल्या लोकांनी खूपच चांगल्या पद्धतीने आपले आदरातिथ्य केले. आपल्या मायदेशी येऊन, आपल्या लोकांमध्ये मिसळून खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल; अखेर 'त्या' चिमुकल्यांची थंडीपासून सुटका