पुणे - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यातून अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या नागरीकांना सूट देण्यात आलीय. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट आणि भुसार बाजार सुरू होते. मात्र, संपूर्ण पुणे शहराला भाजीपाल्याचा पुरवठा करणारे मार्केटयार्ड बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता पोलीस हमाल आणि इतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करत असल्यामुळे भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी संघटनेने घेतला आहे. त्यानुसार आजपासून सर्व भुसार बाजारातील सर्व व्यवहार आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
याविषयी अधिक बोलताना पुणे मर्चंट चेंबर असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब ओसवाल म्हणाले, मार्केटमध्ये येणाऱ्या हमाल आणि इतर कर्मचाऱ्यांना पोलीस मध्येच अडवतात, त्याना मारहाण करतात आणि परत पाठवतात. त्यामुळे हमाल दुकानापर्यंत पोहचतच नाहीत. वास्तविक या कर्मचाऱ्यांना मार्केट कमिटी आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. ते पास मान्य करून पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची अडवणूक करू नये. जर पोलिसांकडून हमाल आणि कर्मचाऱ्यांची अडवणूक नाही झाली तर दुकाने भुसार बाजारातील दुकाने पूर्ववत सुरू राहतील.
हमाल पंचायतचे प्रतिनिधी गोरख मेंगडे म्हणाले, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक हमाल मिळेल त्या वाहनाने गावाकडे गेले. त्यानंतर अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही त्यांना परत बोलावले. ते यायलाही तयार आहेत पण पोलिसांची भीती आहे, म्हणून ते येऊ शकत नाहीत. जर पोलिसांनी सन्मानपूर्वक ये जा करू दिली तर हमाल येऊन काम करू शकतील. याशिवाय हमाल हे आपल्या जीवाची पर्वा न करता शहर आणि उपनगरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनाही आरोग्याचा धोका आहे. शासनाने पुढाकार घेऊन त्यांचा आरोग्य विमा उतरवावा अशी मागणीही त्यांनी केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख म्हणाले, आज सकाळीच आम्ही पुना मर्चंट चेंबर आणि हमाल पंचायतीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली. त्यांच्या अडचणीवर आम्ही विभागीय आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावर आता ते काय निर्णय घेतात यावर अवलंबून आहे. सायंकाळी होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.