पुणे - थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी ही घटना महमदवाडी येथील
स.नं.59, तरवडेवस्ती येथे घडली आहे. महमदवाडी येथील एका रहिवाशाकडे असलेल्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी गेले होते यावेळी हा प्रकार घडला.
महमदवाडी येथील शिंदे या वीज ग्राहकाची 1 मार्च 2020 पासून 19 हजार रुपये वीज बिलाची थकबाकी होती. याबाबत वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र वीज बिल भरणा न झाल्याने महावितरणचे कर्मचारी त्यांच्याकडे वीज बिल वसुलीसाठी गेले. त्यावेळी वीज ग्राहक शिंदे यांच्या मुलाने कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबतचा व्हिडीओदेखील या कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर चित्रित केला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा-अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त
वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन-
मागील वर्षभरापासून अनेकांकडे विजेची थकित बिले आहेत. विजेचे बिल वेळेत भरा, मनस्ताप टाळा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी काही ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीजबिल वसुली करण्यात अडथळे येत असल्याने यापुढे असे प्रकार होऊ नये, असे आवाहन महावितरणचे वानवडी भागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप यांनी केले आहे.
दरम्यान, वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने वापरलेल्या विजेचे बिल भरणे आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया