पुणे - राज्यात ओमायक्रॉनसह (Omicron cases Hike) कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ सामूहिक संसर्ग (Community Spread) आहे असे सांगितले जात होते. पण राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या हा सामूहिक संसर्ग नव्हे तर ओमायक्रॉनचा दुसरा टप्पा (Omicron Second Step) आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave) यांनी दिली आहे. तसेच सामूहिक संसर्ग सुरू झाला तर रुग्णसंख्येत जास्ती वाढ होईल, असे देखील भोंडवे यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या नागरिकांना ओमायक्रॉन झाला हा पहिला टप्पा आणि त्यानंतर येथील नागरिकांना ही बाधा होणे हा दुसरा टप्पा असल्याचे डॉ. भोंडवे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
- राज्यात ओमायक्रॉन साथीचा दुसरा टप्पा -
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्यासाठी फक्त एका नव्या व्हेरियंटची गरज आहे असे सांगितले होते. 25 नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की जगात ओमायक्रॉन हा नवीन व्हेरियंट आला असून, त्याचे हळूहळू भारतात देखील रुग्ण सापडायला लागले. मात्र, आता ही रुग्ण संख्या भारताच्या अनेक राज्यात पसरली आहे. पहिल्या टप्प्यात नेहमीच परदेशातून आलेल्या रुग्णांची नोंद होत असते. तसेच कालांतराने येथे असेही काही लोकं असतात जे परदेशात जात नाही मात्र त्यांनाही संसर्ग होतो. त्यामुळे याला ओमायक्रॉनचा दुसरा टप्पा असे म्हणता येईल, असे डॉ. भोंडवे म्हणाले.
देशातील गर्दी, कोरोना नियम न पाळणे या अनेक गोष्टींबरोबर लसीकरण न होणे यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो. सध्या ओमायक्रॉन साथीची हा दुसरा टप्पा आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक हे भारतात आले आणि त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली हा पहिला टप्पा आहे. तर जे नागरिक परदेशात गेले नाहीत मात्र त्यांना ओमायक्रॉन झाला हा दुसरा टप्पा आहे आणि अशा लोकांना सध्या बाधा होत आहे, असे यावेळी डॉ. भोंडवे यांनी सांगितले.
- काही दिवसात लाखांमध्ये रुग्ण हे बाधित होतील -
परदेशातून आलेल्या कोरोनाबाधित नागरिकांची पूर्ण काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे सध्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. आज अनेक लोकांची आरटीपीसीआर टेस्ट झालेली नाही. त्यांना कोणतेही लक्षण नसल्याने त्यांची तपासणी केली नाही. अशांना ओमायक्रॉनची बाधा झाली असून, त्यांना कोणतेही लक्षण नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परदेशी न गेलेल्या लोकांना याची बाधा झाली आहे. सामूहिक संसर्ग सुरू व्हायला वेळ लागेल, तेव्हा 100 च्या पटीत रुग्णसंख्या वाढणार नाही तर 1 हजार किंवा 5 हजारच्या पटीत रोज रुग्णसंख्या वाढत जाणार आहे. तसेच काही दिवसात लाखांमध्ये रुग्ण हे बाधित होतील, अशी भीती देखील यावेळी डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली आहे.