पुणे - बांबूच्या काड्यांना आकर्षक नक्षीकाम व रंगलेपन करून विशिष्ट कोनात केली जाणारी बांधणी आणि त्यातून तयार होणारे रंगबेरंगी इको फ्रेंडली आकाशकंदील हे यंदाच्या दिवाळीत रोषणाई विलोभनीय करणार आहेत. प्रकाशाचा उत्सव असलेली दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना आपल्याला दिसून येत आहे. बाजारात आकाशकंदील व विद्युत दीपमाळ यांच्या खरेदीसाठी देखील नागरिकांनी गर्दी केलेली आहे. महात्मा फुले मंडई शेजारी असलेल्या बुरूड आळीत बांबूपासून बनवलेले आकर्षक आकाशकंदील तयार केले जात आहेत. या पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना यंदा मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
हेही वाचा - Diwali 2021 : घरच्या घरी बनवा काजू कतली
- सण-उत्सवाच्या काळात बुरुड आळीत विविध वस्तूंची होते विक्री -
बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या व्यवसायात प्रामुख्याने बुरुड मंडळी आहेत. पूर्वापार चालत आलेला व्यवसाय अडीअडचणी, नवे प्रवाह आणि काळाच्या कसोटीवर सर्वमान्य ठरलेली व्यवसायाची उपयुक्तता असे बरेच काही या बुरुड आळीत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध धर्मीय सण - उत्सवाच्या काळात देखील त्या त्या सणाच्या निमित्ताने बांबूपासून साहित्य बनवले जातात. गणेशोत्सवात बाप्पाच्या सजावटीचे साहित्य, मोहरम निमित्ताने ताबूत तर दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदील देखील येथे बनवले जातात.
- पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना मागणी -
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बांबूपासून विविध साहित्य बनवून देखील विक्री केली गेली नव्हती. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या प्रमाणात बांबूपासून बनवण्यात आलेल्या या आकाशकंदीलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिवाळीत आकाशकंदील वापरल्यानंतर त्याचा वापर देखील पुन्हा विविध डेकोरेशनसाठी केला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने निवडणुकीचा काळ नजीक असल्याने प्रभागातील नागरिकांना दिवाळी भेट म्हणून नगरसेवक हे पर्यावरणपूरक बांबूचे आकाशकंदील भेट देत आहेत.
- आकर्षक अशा विविध बांबूच्या वस्तू उपलब्ध -
आधुनिक इलेक्ट्रॉनिक जगात वावरत असताना मुलांना पारंपरिक खेळांचा विसर पडला आहे. मात्र, पुण्यातील या मध्यवस्तीत असलेल्या बुरुड आळीत बांबूपासून विविध लाकडी खेळणी तयार करण्यावर विशेष लक्ष दिले जाते. रेल्वे इंजिन, बदक गाडी अशा विविध खेळणी तसेच आकाशकंदील, फुलदाण्या, पाणी बॉटल, मोबाईल स्टॅन्ड, मोबाईल स्पीकर स्टॅन्ड अशा विविध वस्तू या ठिकाणी बनवले जातात. या ठिकाणी 60 रुपयांपासून ते हजार बाराशे रुपयांपर्यंत विविध बांबूच्या वस्तू मिळतात.
हेही वाचा - Diwali 2021 : पुण्यातील 'ही' बेकरी तयार करते पर्यावरणपूरक 'चॉकलेटचे फटाके'!