पुणे - पुण्यातील 'मायलॅब' या कंपनीने कोविसेल्फ नावाचे एक अँटीजन किट तयार केले आहे. याद्वारे घरबसल्या स्वतः कोरोना चाचणी करता येणार आहे. या किटला भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) देखील मान्यता दिली आहे. या किटची किंमत फक्त 250 रुपये इतकी असणार आहे.
हे किट लवकरच येणार बाजारात -
पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटीजन टेस्ट किट तयार केले आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. या किटद्वारे चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणे असूनही ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानले जाईल. ते स्वतःची आरटीपीसीआर टेस्ट करू शकतात. या किटच्या संपूर्ण चाचण्या यशस्वी झाल्या असून, लवकरच हे किट बाजारात उपलब्ध होणार आहे. कोविशेल्फ अँटीजेन किटचा वापर कसा करावा याविषयी मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन कंपनीचे संचालक सुजित जैन यांनी 'ई टीव्ही भारत'ला सविस्तर माहिती दिली आहे.
हेही वाचा - मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? दिल्लीपाठोपाठ मुंबईतही काँग्रेसची बॅनरबाजी