पुणे - कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जग आता हादरले आहे. फक्त भारतच नाही, तर संपुर्ण जग लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व अंगणवाड्या, शाळा बंद झाल्या. तरिही कोरोना विषाणूच्या विळख्यात अनेक लहान मुलेही आली आहेत. पुण्यात अशा लहान मुलांना लवळे कॅम्पस येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या लहान मुलांना संभाळणे हे उपचारापेक्षाही अधिक कठिण काम. बहुदा मुले चिडचीड करतात, अस्वस्थ होतात. यासाठीच रुग्णालय प्रशासनाने यावर एक नामी शक्कल लढवली आहे.
पुणे शहरात कोरोनाबाधित लहान मुलांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवळे कॅम्पस येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात देखील कोरोनाची बाधा झालेले 1 वर्षांपासून ते 16 वर्षांपर्यंतची अनेक मुले आहेत. अनेक दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या या मुलांची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच या मुलांसाठी संगीत खुर्ची, नृत्य आणि इतरही वेगवेगळे खेळही खेळवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित मुलांसाठी हे रुग्णालय उन्हाळी शिबीर बनल्यासारखे दिसत आहे.
हेही वाचा... दारूच्या दुकांनासमोरील गर्दी नियंत्रणात आणा अन्यथा दुकाने बंद करा - दरेकर
मुलांसोबत संवाद साधणे गरजेचे : डॉ. विजय नटराजन
सिम्बॉयोसिस रुग्णालयाचे सीईओ डॉ. विजय नटराजन यांनी रुग्णालयातील उपक्रमाबाब अधिक माहिती दिली आहे. 'रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांपैकी अनेक मुले पहिल्यांदाच इतक्या दिवसांसाठी रुग्णालयात दाखल झाली आहेत. या मुलांना आपल्याला कुठला वेगळा आजार झालाय, याची भीती वाटू नये. त्यांच्या मनावर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी त्यांच्यासोबत सतत संवाद साधने आवश्यक असते' असे डॉ. नटराजन यांनी म्हटले आहे.
लहान मुलांना सतत कशात तरी गुंतवणे हा सर्वात सोपा उपाय...
आजारपणात लहान मुले बहुदा चिडचीड करतात, अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांच्यासोबत संवाद साधणे त्याबरोबरच त्यांना कशात तरी गुंतवणूक ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. नटराजन यांनी सांगितले. 'रुग्णालयात मुलांवर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांच्या इतर भावंडानाही जर कोरोना झाला असेल आणि ते इतर रुग्णालयात असतील तर त्यांना आमच्या रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून ते आपल्या कुटुंबासोबत राहतील. तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांना आम्ही गुंतवून ठेवतो आहोत.. टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम लावून देणे, विविध खेळ खेळवणे, यांसारखे उपक्रम आम्ही राबवत आहोत. जेणेकरून त्यांच्या मनात वेगळे विचार येणार नाहीत' अशी माहिती डॉ. विजय नटराजन यांनी दिली.