पुणे - महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला आणि महाविकास आघाडीच्या एकूण ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र ज्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही असे अनेक आमदार नाराज आहेत. मंत्रीपद डावलल्याने भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांचा पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला करत काँग्रेस भवनाची जबरदस्त तोडफोड केली.
हेही वाचा...'...तर महाविकास आघाडीची माती झाल्याशिवाय राहणार नाही'
भोर वेल्हा मुळशीचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात जोरदार राडा केला. त्यांनी शिवाजीनगर येथील काँग्रेस कार्यलयाची तोडफोड केली. पुणे शहर व जिल्हा कार्यलय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत. तेथे घोषणाबाजी करत आलेल्या या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
हेही वाचा... खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
थोपटेंच्या 25 ते 30 नाराज कार्यकर्त्यांनी भवनाची तोडफोड केली. यावेळी कार्यालयातील काचा फोडल्या गेल्या. तसेच शहराध्यक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. जिल्हा अध्यक्षांच्याही कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास अर्धा तास हा राडा सुरू होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.