पुणे - कोरोना विषाणू काळात देशात आर्थिक मंदी असताना केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. याविरोधात आज (सोमवार) देशभरात सर्वत्र काँग्रेसच्यावतीने आंदोलन केले जात आहे. पुण्यातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अलका चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
देशातील नागरिक दुहेरी संकटात सापडला आहे. त्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या देशात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली, याचा निषेध बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा... 'महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी नाही तर आकड्यांशी लढतेय'
महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार...
राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांमध्ये समन्वय असून आम्ही सर्व चांगल्या प्रकारे काम करत आहोत. विरोधक सतत आमच्यावर टिका करत आहे. मात्र, त्यांनी एवढेच लक्षात ठेवावे की, आमचे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. त्यांनी आता स्वप्न पाहण्याचेही सोडून द्यावे, असे चोख प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.