पुणे - लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा जाहीरनामा आज खऱ्या चौकीदाराच्या हातून प्रसिद्ध करण्यात आला. शहराच्या शाश्वत विकासाचे मॉडेल या मुद्यांचा जाहीरनाम्यात समावेश असल्याचे मोहन जोशी यांनी यावेळी सांगितले. हा फेकूनामा नसून जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करणारा जाहीरनामा असल्याचेही ते म्हणाले.
जोशी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला आणि विद्यार्थी आशा सर्वच घटकांचा विचार केला आहे. हा फेकूनामा नाही, तर विजयी झाल्यानंतर समता भूमी येथे येऊन दिलेली आश्वासने पूर्ण केली, हे सांगणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य पुणेकरांना न्याय देणारा, त्यांचे प्रश्न, समस्या सोडवणारा, शहराला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेणारा, असे जाहीरनाम्याचे स्वरूप असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी मोहन जोशी यांनी खराखुरा चौकीदार आणला होता. मोहम्मद इस्माईल शेख, असे या चौकीदाराचे नाव आहे. शेख यांनीही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' या घोषणेवर नाराजी व्यक्त केली. मोदी हे सर्वसामान्यांचे नाही, तर अंबानी, अदानी, मल्ल्या आणि निरव मोदी यांचे चौकीदार आहेत. खऱ्या चौकीदाराचे काम समजून घ्यायचे असेल, तर बारातास काम करून पहा, मग तुम्हाला समजेल असा टोलाही चौकीदार मोहम्मद इस्माईल शेख यांनी यावेळी लगावला.