पुणे - शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये व कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी ६ ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
6 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गोवा व महाराष्ट्र्राच्या किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून 6 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, मुळशी, वेल्हा, जुन्नर या तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष असून, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही ते म्हणाले आहेत.
हवामान खात्याने पुण्यात पुढील काही काळ अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे देखील भरली आहेत. यामुळे नदीपात्रालगतच्या शेकडो रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.