पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला आहे. माझे नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप लागत नाही. ते माझे चांगले मित्र आहे आणि माझ्या नावामुळे एखाद्याची झोप चांगली होत असेल, तेही गोळीशिवाय तर हरकत नाही. मित्रासाठी चालेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला.
हेही वाचा - शिल्पकलेने नटलेले पुण्यातील 'त्रिशुंड गणपती मंदिर'; जाणून घ्या इतिहास
..ही त्यांची कार्यपद्धती
हसन मुश्रीफ म्हणतात की, ते किरीट सोमैय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार. ही त्यांची कार्यपद्धती आहे. काहीही झाले की, 100 कोटी, 200 कोटींचा दावा दाखल करायचे. अलीकडच्या काळात इतके घोटाळे समोर येत आहेत की, 100 कोटींचा दावा दाखल करणे ही छोटी गोष्ट आहे. 500 ते 1 हजार कोटींचा दावा दाखल केला पाहिजे आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना न्यायालयात स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, त्या स्टॅम्प ड्युटीसाठी व्हाईट पैसे आहेत का? की लोक वर्गणी करून देणार आहे. कारण, ब्लॅक मनी त्याला लागत नाही तर, व्हाईट मनी लागते, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
19 महिने काय झोपा काढत होता का
महाराष्ट्रात ऐतिहासिक असा हॅम नावाचा जो प्रकल्प केला आहे, ज्याचे रस्ते पूर्ण होण्याची उदघाटने हे करत आहेत, तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी महाराष्ट्रात आणला. 900 कोटींचे बजेट 5 वर्षांत 9 हजार कोटीचे झाले. आत्ता त्या हॅममध्ये काही घोटाळा आहे, असे जर मुश्रीफ यांचे म्हणणे आहे तर, 19 महिने काय झोपा काढत होता का? 19 महिन्यांनंतर साक्षात्कार झाला, की त्याच्यात घोटाळा आहे, हॅमबाबत त्यांना जर तक्रार दाखल करायची असेल तर त्यांनी ती करावी. 19 महिन्यांत खूप काही करता आले असते. पैसे खाण्याव्यतिरिक्त काही कामे नव्हती यांना, म्हणून यांच्या अशा धमक्यांना मी काही घाबरणार नाही. तुमची काही चूक नसेल तर, तुम्ही घाबरता कशाला, असे देखील पाटील म्हणाले.
हेही वाचा - गणेशाला का म्हटले जाते 'विकट', ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट