पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे पुण्यातील विजय माने (duplicate of CM Vijay Mane) यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे (Case filed in Pune against duplicate of CM).
गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल केल्याने कारवाई - फिर्यादी हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला.
गैरसमज पसरवल्याचे कारण - फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोशाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता. विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे कारण फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.