पुणे - शहरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या पुणे शहरात 23 हजार 62 इतके रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनासाठी 3, 937 खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांनाही अधिक खाटा देण्याच्या अधिकाऱ्यांकडून सूचना करण्यात आल्या आहेत.
पुणे शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी असली तरी जवळपास 75 ते 80 टक्के रुग्ण हे गृह विलगणीकरणामध्ये आहेत. तर सध्या 3,373 कोरोनाबाधित रुग्णालयामध्ये दाखल आहेत. पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या खाटांची संख्या 3, 937 इतकी आहे. एकूण खाटांपैकी 564 शिल्लक आहेत.
हेही वाचा-पुण्यात लसीचा तुटवडा नाही - महापौर मुरलीधर मोहोळ
- पुणे शहरातील एकूण कोरोनासाठी उपलब्ध खाटा -3937
शिल्लक खाटा - 564
- ऑक्सिजन नसलेल्या आयसोलेशन खाटा - 773
ऑक्सिजन नसलेल्या शिल्लक खाटा- 177
- ऑक्सिजन खाटा - 2, 545
ऑक्सिजन असलेल्या शिल्लक खाटा - 314
- आयसीयू व्हेंटिलेटर नसलेल्या खाटा -275
आयसीयू व्हेंटिलेटर नसलेल्या शिल्लक खाटा - 30
- आयसीयू व्हेंटिलेटर असलेल्या खाटा - 344
आयसीयू व्हेंटिलेटर असलेल्या शिल्लक खाटा - 43
दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-पुण्यात गरज पडल्यास जम्बो हॉस्पिटल सुरू केले जाईल - महापौर मुरलीधर मोहोळ
खासगी रुग्णालयांकडून आणखी 1600 खाटा-
महापालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालये यांच्यात सोमवारीच बैठक झाली होती. खासगी रुग्णालयात आवश्यक खाटा उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले होते. तसेच खासगी रुग्णालयांनी 50 टक्के खाटा कोरोनासाठी राखीव ठेवावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आणखी 1600 खाटा उपलब्ध होऊ शकतात.
लॉकडाऊनला महापौरांचा विरोध
महापौर म्हणाले, आजही पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे या परिस्थितीत पूर्ण करणे योग्य नाही.. पुण्यातील काही संस्थांनी यापूर्वी सर्वेक्षण करून सादर केलेल्या अहवालात निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले होते. त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या वाढली म्हणून लॉकडाऊन लागू करणे हा त्यावरचा मार्ग नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हाच त्यावरचा उपाय आहे.
शहरात ज्याप्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावर आपण तीन आघाड्यांवर काम करू शकतो. झपाट्याने वाढत जाणारी रुग्णांची संख्या पाहता त्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करावी लागेल. यामध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे, लसीकरण मोठ्या प्रमाणात करणे, स्वॅब टेस्टची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना करून आपण कोरोना नियंत्रणात आणू शकतो. नियमांची कडक अंमलबजावणी करणे किंवा आणखी काही निर्बंध आणून वाढत्या रुग्ण संख्येला पायबंद घालता येईल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.