पुणे - फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने पोलीस हवालदाराचा चाकूने वार करून खून केला होता. या खूनप्रकरणातील संशयित महिलेला ताब्यात घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन (वय 36) याने पोलीस हवालदारावर चाकूने वार करून, हत्या केली होती. या प्रकारणाने शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी जाग्यावरच गुंड प्रवीण उर्फ पव्या याला पकडले होते. याच प्रकरणातील अन्य एका महिला आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उत्तर प्रदेशात गेले होते.
पोलिसांवर हल्ला करत वाहानाची तोडफोड
ही संशयित महिला गाझियाबादला पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या महिलेचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांच्यासह 6 जणांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. गाझियाबाद येथील एका वेश्या वस्तीत ही महिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिला पकडण्यासाठी पोलीस गेले असताना जमावाने पोलिसांवर हल्ला करत, त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. हल्ला झाल्यानंतर देखील पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून, ते महिलेसह पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हेही वाचा - ७२ वर्षीय वृद्ध महिला रुग्णालयातून बेपत्ता, पुणे शहरातील घटना