पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महामार्गावर नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे संरक्षण करावे, असे म्हटले आहे.
स्पीडगन आल्याने गतीवर नियंत्रण
उर्से टोल नाका येथे वाहतूक पोलिसांनी सिटबेल्ट, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब देऊन अभिनंदन केले. द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट असतात. स्पीडगन आल्याने वाहनांच्या गतीवर नियंत्रण आले आहे. मात्र, दुसरीकडे लेन कटिंग, द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न वापरणे अशा घटना घडत असून यामधून अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.
नियमांचे पालन करणाऱ्यांना गुलाब
उर्से टोल नाका येथे वाहतूक पोलीस नीलेश सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनचालकांना थांबवून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.