पुणे - पक्षातून कोण जातंय याकडे लक्ष देऊ नका, ही नव्या नेतृत्वासाठी संधी आहे. पक्षाचे चांगले काम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर पोहोचवा सध्याचा काळ जरी वाईट असला तरी ही एक सुवर्णसंधी म्हणून त्याकडे बघा. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून युवासंवाद कार्यक्रम आयोजित करत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुण्यात संवाद साधला.
अमोल कोल्हे यांनी स्टेजवर भाषण न करता थेट युवकांमध्ये जात या युवा कार्यकर्त्यांकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी राज्यभरातून आलेल्या युवक कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्व पक्षातील प्रस्थापित नेते यांच्या विरोधातच गार्हाणे मांडले. आम्ही पक्षासाठी तळमळीने काम करतो. मात्र, त्या-त्या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व कंपूशाही करते आम्ही पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादीचे काम करत असल्याचेही ते म्हणाले.
ज्या वेळेस सत्ता येते त्यावेळेस काही ठराविक लोकांना त्याचा लाभ होतो. अशा अनेक समस्या युवकांनी मनमोकळेपणाने मांडल्या. या समस्यांना खासदार अमोल कोल्हे यांनी समर्पक उत्तर देत कार्यकर्त्यांना त्यांच्या गाऱ्ह्याण्यांच योग्य निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले. आगामी काळ हा आपला आहे. भविष्यात बदल घडलेला दिसेल, असे सांगत अमोल कोल्हे यांनी युवकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील उपस्थित होते.