पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Ambedkar jayanti 2022 ) यांची १३१ वी जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. एक थोर समाजसुधारक, महान अर्थतज्ज्ञ, उत्तम वक्ता, लेखक, पत्रकार, उत्तम संसदपटू, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb ambedkar relation with Pune ) यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अनेक चळवळी उभ्या केल्या. अशा या महामानवाचे पुणे शहराशी असलेल्या संबंधांबाबत आपण आज जाणून घेऊया.
हेही वाचा - पुण्यात लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली विशेष वाहने लष्करात दाखल
पुण्याशी अतूट नाते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्याचे एक अतूट नाते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुण्यात जेव्हा यायचे तेव्हा ते पुणे स्टेशन येथील नॅशनल हॉटेलमध्ये थांबायचे. त्यांची एक ठरलेली रूम होती. त्यात ते तळमजल्यावर थांबायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई लेजिस्लेटिव्हचे सदस्य असताना जेव्हा अधिवेशन पुण्यात व्हायचे तेव्हा म्हणजेच आजचे विभागीय आयुक्त कार्यालय येथे होत होते, तेव्हा बाबासाहेब हे तिथे यायचे. असे अनेक संबंध बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्याशी होते, अशी माहिती यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.
या बुक डेपोत पुस्तक वाचण्यात मग्न राहायचे बाबासाहेब - एकेकाळी पुण्यात खूप पाऊस झाला होता. काही काळाने तो जोरदार पाऊस थांबला. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे वाहनाने डेक्कन येथील आयडीएल बुक डेपो येथे गेले. तिथे त्यांनी पुस्तक खरेदी केले. बाबासाहेब जेव्हा जेव्हा पुण्यात येत असे तेव्हा तासनतास ते या आयडीएल बुक डेपोत पुस्तक वाचन करायचे. काही वेळा तर त्यांना भेटण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागायच्या. पण, ते आत पुस्तक वाचण्यात मग्न व्हायचे. पाऊस पूर्णपणे थांबला होता पण नदीला पूर आला होता. तेव्हा पूर पाहण्यासाठी लकडी पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. जेव्हा लोकांना कळले की, बाबासाहेब हे आयडीएल बुक डेपोत आहे तेव्हा त्यांना बघण्यासाठी खूप लोक आले आणि तेव्हा लोकांमधून वाट काढताना बाबासाहेबांना कठीण झाले होते, असे देखील यावेळी कांबळे म्हणाले.
पुणे करार - १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारवरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला. मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला.
पुणे करार (संक्षिप्त मसुदा) - १) प्रांतीय विधानसभांमध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी ज्या राखीव जागा ठेवण्यात येतील त्या याप्रमाणे : मद्रास ३०, मुंबई व सिंध मिळून १५, पंजाब-७, बिहार व ओरिसा - १८, मध्यभारत- २०, आसाम- ७, बंगाल- ३०, मध्यप्रांत-२० अशा प्रकारे एकूण १४८ जागा अस्पृश्यांसाठी देण्यात येतील.
२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवारांतून ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व कलम दोननुसार होईल.
४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८ टक्के असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल.
५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था ज्यांचा वर उल्लेख केला आहे अशा केंद्रीय, तसेच प्रांतिक कार्यकारिणीसाठी पहिल्या १० वर्षांनंतर समाप्त होईल.
६) जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षांद्वारे आपसात समझौता होऊन दलितांच्या प्रतिनिधीस हटविण्याचा सर्वसंमत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व कलम १ व ४ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे अंमलात असेल.
७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समितीच्या अहवालानुसार असेल.
असा होता पुणे करार - मसुदा तयार झाला, सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यांनी एम.सी. राजा यांनी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करू देणार नाही, अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण एम.सी. राजांनी मुंजेसोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे, अशा अस्पृश्यद्रोहींनी या करारावर सही करू नये, अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबांनी मुख्य सही केली, तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली. आशा अनेक आठवणी पुणे शहराशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असून, एक अतूट नाते बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्याशी होते, असे देखील यावेळी कांबळे यांनी सांगितले.