पुणे - क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करून भारताला देदीप्यमान यश मिळवून देणारा मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित क्रिकेट सामन्यांना हजेरी लावली असता ते बोलत होते.
हरलो म्हणून खचून जायचे नाही
हरलो म्हणून खचून जायचे नाही, हे महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणेने दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अत्यंत वाईट हरलो, त्याच दुःख भारतीयांना झालं. मात्र, पुन्हा संघ बांधणी करत नवीन खेळाडूंना संधी दिली. त्यांच्या जिद्दीवर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला, अशा शब्दांत अजित पवार यांनी अजिंक्य रहाणेचे कौतुक केले.
पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधत्व करावे
आयपीएलमधूनही नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी क्रिकेटमध्येच स्वतःच करिअर केलं. त्यात, धोनी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांची उदाहरणे समोर आहेत. पुढे देखील आणखी दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. महाराष्ट्रात, पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडावेत. त्यांनी महाराष्ट्राच, देशाचं प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शरद पवारांनी क्रिकेटला वेगळे महत्व प्राप्त करून दिले
देशात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून त्याला वेगळे महत्व प्राप्त करून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध, कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट अशा खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम ,अडचणी सोडण्याचा काम, खेळाडूंना चांगले मानधन कसे मिळेल, सर्वसामान्य कुटुंबातील गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू, विकेटकीपर असेल यांना संधी कशी मिळेल हे सर्व त्यांनी पाहिले असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - प्रबोधनकारांचा पुरोगामीत्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक - अजित पवार