पुणे- भंडारामधील नवजात बालकांच्या मृत्यूची घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवजात बालक ठेवण्यात आली आहेत, अशा सर्व एनआयसीयूचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमाला आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज पुण्यात आले होते. त्यांना आरोग्यमंत्र्याच्या नात्याने मी भंडारा येथे जाण्यास सांगितले आहे. नवजात अर्भकांना जिथे ठेवले जाते, अशा महाराष्ट्रातील सगळ्या एनआयसीयू युनिटचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत विरोधी पक्षाचे नेते सरकारवर आरोप करत आहेत. यावर बोलताना कोणी काय वक्तव्य करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर यामध्ये नक्की काय घडले, हे समजू शकेल. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीवरती नक्कीच विचार केला जाईल, असे पवार यावेळी म्हणाले. त्या एनआयसीयूमध्ये 24 तास कर्मचारी असणे आवश्यक होते. भंडारा येथील बालकांच्या मृत्यूच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. मृत बालकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-प्रथमदर्शनीत भंडारा जिल्हा रुग्णालयाची आग शॉर्ट-सर्किटमुळे - आरोग्य राज्यमंत्री
सोलापूरमधील शिवसेना नेते महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की महेश कोठे हे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये असे ठरलेले आहे. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत. त्यामुळे महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन, असे पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा-'भंडाऱ्यातील घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
जिल्हा रुग्णालयात 10 नवजात बालकांचा मृत्यू-
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला.