पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाची योजना असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचा ऑनलाइन लोकार्पण कार्यक्रम गाजला तो उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आल्याने. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसापासून पुण्यात चर्चा होती, माध्यमामध्ये चर्चा होती आणि या चर्चेचा उल्लेख शुक्रवारी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाइन लोकार्पण पुणे महापालिकेच्या सभागृहात झाले त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी मिश्कीलपणे केला.
आम्ही दोघे एकत्र कार्यक्रम करतो म्हणजे काय कुस्त्या करतो की गाण्याचा कार्यक्रम असतो त्याची दोन दिवस आधी आणि दोन दिवस कार्यक्रमानंतर चर्चा सुरू असते, असे सांगत विकासाच्या कामासाठी एकत्र आले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मीडियाला दोन तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर अजित दादा एक तर तुम्ही मला चहाला बोलवत जा नाही तर माझ्याकडे चहाला येत जा, असे आमंत्रणच फडणवीस यांनी अजित पवार यांना आपल्या भाषणात बोलताना दिले.
अजित पवारांनीही आपल्या भाषणात या बातम्यांचा उल्लेख केला मात्र फडणवीस यांनी दिलेल्या चहाच्या आमंत्रणावर बाकी अजित पवारांनी काही न बोलणेच पसंत केले. त्यामुळे फडणवीसांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित दादांना दिलेल्या चहाच्या निमंत्रणावर दादाची भूमिका काही कळली नाही.