पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढत आहे. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मी काही गृहमंत्री नाही असे म्हणत त्यांनी या प्रकरणाविषयी असंवेदनशीलता दाखवून दिली. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आज बारा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र, आतापर्यंत पोलिसांना या प्रकरणातील गुढ काही उकलता आलेले नाही. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. चौकशी कधी करावी, काय करावी याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मी काही गृहमंत्री नाही. मात्र, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि नेहमीप्रमाणे सांगतोय की याप्रकरणी चौकशी सुरू असून चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. पोलिसांची चौकशी सुरू असताना मध्ये लुडबुड करण्याचे काहीच कारण नाही. पोलिसांवर चौकशी करण्याची जबाबदारी टाकली आहे. याप्रकरणातील सत्य शोधण्याचे काम सुरू आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का ? अजित पवार म्हणाले -
संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, रेल्वेचा अपघात झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता. त्यामुळे याप्रकरणाशी लाल बहादूर शास्त्रींची तुलना होऊ शकते का? त्या त्या वेळेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका, त्यांनी घेतलेले निर्णय हे आज देखील सर्वांना माहीत आहेत. त्याची उदाहरणेही आपण देतो. मात्र, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पूर्वीच्या काळी कोर्टाने ताशेरे ओढले तरी राजीनामे द्यावे लागत होते. आता काय होतंय आणि काय घडते हे आपण पाहतो.
राठोड यांच्याशी माझी भेट झाली तर -
संजय राठोड अजूनही नॉटरीचेबल आहेत याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, राठोड यांच्याशी माझी भेट झाली तर मी त्यांना सांगेन सगळे पत्रकार तुमची आत्मीयतेने वाट पहात आहेत. त्यांची भेट घ्या.