पुणे - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ठरलेल्या निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार असल्याने यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. अजूनही होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर सूचना देऊन नुकसानग्रस्त भागात एनडीआरएफच्या जवानांना पाठवणे, बोटी पाठवणे अशी कामे करत आहेत. मी सुद्धा आज पुण्यात सकाळी साडेसात वाजता आलो असून त्यासंबंधी आढावा घेणार आहे, असे पवार म्हणाले. राज्यावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज असून संपूर्ण प्रशासनाला कामावर लावले असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासकामे होत असताना बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आणि मग अशाप्रकारच्या घटना होत असतात. याच दुसरे कारण असे की, काही ठिकाणी सहा सहा इंच पाऊस पडला. त्यामुळे ओढ्यात, नदिनाल्यात पाऊस वाहून जाण्याची क्षमता नव्हती, त्यामुळे हे पाणी बाहेर पसरले. त्यामुळे अनेकांची घरे पाण्याखाली गेली, त्यांचं स्थलांतर करण्यात आले. त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली.
पुणे, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. येथील सर्व घडामोडी खरे राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील अनेक पुलांचे नुकसान झाले आहे. याविषयी मुख्य अभयंत्यांना आदेश देण्यात आले असून तातडीने या कामासाठी निधी देण्यास सांगितले आहे. जेणेकरून पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होईल.
पंढरपूर भिंत प्रकरण
दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने पंढरपूरमध्ये नव्याने बांधलेली भिंत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचे बचावकार्य सुरू होते. पंढरपूर येथे भिंत कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्याठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले असून पोलीस अधीक्षक त्यावर लक्ष ठेऊन आहेत, असे पवार म्हणाले. ज्या ज्या भागात पाणी साचले असेल तो भाग पूर्वपदावर आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार योजनेची कॅगच्या अहवालानुसार चौकशी सुरू आहे. भाजपा सरकारच्या काळात हा आहवाल आला होता. तानाजी सावंत यांच्याकडे जलसंधारण मंत्रालयाचा पदभार होता. आता महाविकास आघाडी सूडाचे राजकारण करत असल्याचा दावा चुकीचा आहे.
शिवेंद्रराजे आणि पवार भेट
शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. यावर प्रश्न विचारल्यानंतर ते विकास कामासाठी भेटून गेले, असे पवार म्हणाले. आशा भेटी होत राहतात. त्यामुळे अस काही अर्थ काढू नका. त्यात काही काळबेरे नाही. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती, ती मी तुम्हाला दिली.