पुणे - येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. आकाश बाबूलाल पवार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी सकाळी आकाश आणि हर्षद हनिफ सय्यद या दोघांनी तुरुंगातील खिडकीचा गज काढून पलायन केले होते. हर्षद हनिफ सय्यदला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने तर, दुसरा आरोपी आकाशला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात आरोपी आकाश आणि हर्षद या दोघांना ठेवण्यात आले होते. दोघांना आर्म ऍक्ट आणि दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना विलगिकरणात ठेवले होते.
आकाश बाबूलाल पवार आणि हर्षद हनिफ सय्यद या दोघांनी खिडकीचे गज काढून पलायन केले. यातील आकाश हा वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, अधिकारी सिद्धनाथ बाबर यांनी तिथे सापळा रचला. बालाजी लॉन, काळेवाडी येथे तो आला असता मोठया शिताफीने आकाशला ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेनंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले.