पिंपरी-चिंचवड - भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बीआरटी डिव्हायडरवर धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी आकुर्डी येथील जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडली. दरम्यान, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याने अपघाताची भीषणता लक्षात येते.
आर्यन नरेंद्र परमार (वय 21, रा. दापोडी), श्वेता अशोक गजभिये (वय 21, रा. दापोडी, मूळ रा. भंडारा) अशी मृत्यू झालेल्या तरुण आणि तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि श्वेता हे मित्र होते. ते रविवारी दुपारी निगडी ते पिंपरी या मार्गावरून दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी खंडोबा माळ आकुर्डी येथे आली असता भरधाव दुचाकीची बीआरटीच्या डिव्हायडरला जोरात धडक बसली. या भीषण अपघात आर्यन आणि श्वेता हे गंभीर जखमी झाले.
आर्यनच्या दुचाकीची एका मोपेड दुचाकीलाही धडक बसली. त्यात दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. डिव्हायडरला दुचाकी धडकल्यानंतर पेट्रोल सांडल्याने दुचाकीने जागीच पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. आर्यन आणि श्वेता यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.