पुणे - अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंधात असताना तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ तयार केला. परंतु, ब्रेकअप झाल्यानंतर तोच व्हिडिओ तरुणी राहत असलेल्या वस्तीतील मुलांना पाठवत तिची बदनामी केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत संबंधित प्रियकराला अटक केली आहे.
हेही वाचा - आपण कोणी सुपरमॅन जरी असलो तरी सुपर निरोगी माणूस नाही - निलम गोऱ्हे
निलेश सुभाष शेंडगे (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी निलेश शेंडगे याने पीडित तरुणी अल्पवयीन असताना (2018 साली) तिच्यासोबत ओळख वाढवली आणि प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला मित्राच्या रूमवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेचा त्याने व्हिडिओ देखील तयार केला. पीडित तरुणी यातून गर्भवती राहिल्यानंतर त्याने बहिणीच्या मदतीने तिचा गर्भपात केला.
दरम्यान पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी आरोपीकडे लग्न करण्याविषयी विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पीडित तरुणी राहत असलेल्या परिसरातील तरुणांच्या मोबाईलवर दोघांच्या शारीरिक संबंधांचा अश्लील व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून निलेश शेंडगे याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - मुख्य मंदिरामध्येच होणार 'दगडूशेठ'चा गणेशोत्सव; वाचा यंदाचे वैशिष्टये