पुणे - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येमध्ये पुणे विभागात 8 ने वाढ झाली आहे. सोमवार 30 मार्च अखेर, विभागात एकूण रुग्णसंख्या 72 आहे यात पुणे 43, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण आहेत. सोमवारी पुण्यामधील कोरोना विषाणूबाधीत 52 वर्षाच्या एका पुरुष रुग्णाचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या रुग्णाला कोणापासून कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, याची अद्याप निश्चीत माहिती मिळालेली नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विभागात तपासणीसाठी एकूण 1 हजार 365 नमुने पाठवले होते. त्यापैकी 1 हजार 282 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 83 चे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी 1 हजार 193 नमुने निगेटीव्ह आहेत, तर 67 नमुने पॉझिटीव्ह आहेत. तसेच 22 नमुने निष्कर्ष न काढण्यायोग्य आहेत. आतापर्यंत 15 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 3 हजार 16 व्यक्तींचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला असून 4 हजार 381 व्यक्ती अजूनही क्वारंटाइन आहेत.