बारामती (पुणे) - अंगावर खाज येण्याची पावडर टाकत कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित करून त्याच्याकडील बँगेतील २ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना बारामती शहरातील भिगवण चौकात घडली. स्वप्निल विलास पवार असे पैसे चोरी गेलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
स्वप्निल विलास पवार (रा. इको व्हिलेज बिल्डिंग, कसबा बारामती ) हे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतात. शोरूमचे संचालक सचिन सातव यांच्या घरून त्यांनी १ लाख ४१ हजार ८०० रुपयांची रक्कम आणली होती. ती एका बॅगेत भरून ते शहरातील भिगवण चौकात बारामती सहकारी बँकेत आले. बँकेतून १ लाख रुपये काढून त्यांनी बॅगेत ठेवले. चालत ते दुचाकीकडे येत असताना तोंडाला पांढरा रुमाल बांधलेल्या तरुणाने किस का, पैसा नीचे गिरा है.. अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यांनी खाली पाहिले असता तेथे २० व १० रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. त्या घेण्यासाठी खाली वाकले असता त्यांच्या मानेवर व कॉलरवर काहीतरी पडल्याची जाणीव झाली.
मान खाजवू लागल्याने ते जवळच्या चहाच्या गाड्यावर गेले. मान धुवत असताना पैशाची बॅग त्यांनी शेजारील स्टूलवर ठेवली होती. शर्ट घालत असताना ही बॅग त्यांना दिसली नाही. त्यांनी इकडे तिकडे पाहिले असता तो तरुण तेथून पसार झाल्याचे दिसून आले. या बॅगेत २ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट, महालक्ष्मी मु.प्रायव्हेट लिमिटेडचे तीन चेकबुक व पासबुक असे साहित्य होते.