पुणे - देशभरात लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे आचारसंहिता देखील लागू झाली आहे. त्यातच आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेतील पदाधि-यांनी आपली सरकारी वाहने जमा करण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी पालिका मुख्यालयात येऊन आपले सरकारी वाहन जमा केले. आणि आपल्या दुचाकीवरुन घरी रवाना झाले.
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू झाल्याने पालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या वापरात शासकीय वाहने असतात. अशा पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.
निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले. त्यानंतर दुचाकीवरुन महापौर जाधव घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान दोन महिने पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरण्यावर निर्बंध असणार आहेत.