पणजी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज गोव्यात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या 'गोवा विधिकार दिन ' कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दक्षिण गोव्यातील दाबोळी येथील आय एन एस हंसा विमानतळ राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
यावर्षी गोवा मुक्तीचे हिरकमोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वर्षभर भरगच्च आणि माहिती पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे यावर्षीच्या विधिकार दिन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहेत.
प्रतापसिंह राणे यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते विशेष गौरव -
गोवा विधानसभेचे कामकाज 9 जानेवारी 1964 या दिवसापासून सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी हा दिवस विधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी आजी माजी आमदार उपस्थित असतात. यावर्षीच्या कार्यक्रमात तिसऱ्या विधानसभेचे सदस्यांबरोबरच सर्वाधिक काळ आमदार म्हणून विधानसभा सदस्य असलेले पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे. राणे सातत्यपूर्ण निवडून येत असून यावर्षी विधानसभा सदस्य म्हणून 50 वर्षे पूर्ण करणार आहे.