पणजी - लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या हिमाचल प्रदेशातील 1 हजार 473 कामगारांना घेऊन मडगावहून श्रमिक एक्स्प्रेस (01068) बुधवारी संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाली. गोव्यातून दूसऱ्या राज्यात जाणारी ही चौथी श्रमिक एक्स्प्रेस आहे.
कदंब महामंडळाच्या बसमधून राज्यभरातील कामगारांना एकत्रित स्टेशनबाहेर आणण्यात आले. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोविड-19 लक्षणांची तपासणी करून फलाटावर सोडण्यात आले. ही सर्व प्रक्रिया दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजू देसाई, पोलीस अधीक्षक सॅमी तवारीस, सेराफिन डायस, कोकण रेल्वेचे उपव्यवस्थापक बबन घाटगे, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि दक्षिण गोव्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यासाठी नोडल अधिकारी म्हणून कुणाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या व्यवस्थापनाबद्दल त्यांचे कौतुक केले.
हिमालय प्रदेशचे नोडल अधिकारी या प्रवाशी कामगारांना उतरवून घेणार असून तेथून स्थानिक वाहतूक व्यवस्था करत त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, गोव्यातून यापूर्वी मध्यप्रदेशसाठी एक तर उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) करिता दोन श्रमिक एक्स्प्रेस यापूर्वी पाठविण्यात आल्या आहेत.