पणजी - राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक पटकावलेल्या अल्पवयीन जलतरणपटूवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी संशयीत आरोपी जलतरण प्रशिक्षक सुरजित गांगुलीला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. यासाठी पश्चिम बंगाल आणि दिल्ली पोलिसांनी गोवा पथकाला मदत केली आहे.
हेही वाचा - जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाची डोक्यात दगड घालून हत्या, कारण अस्पष्ट
पिडीत जलतरणपटू पश्चिम बंगालमधील असल्याने तिच्या पालकांनी तेथील हुगळी जिल्ह्यातील रिश्रा पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. तसेच हा प्रकार म्हापसा-गोवा येथे घडल्याने तसा ईमेल बुधवारी रात्री म्हापसा-गोवा पोलिसांना पाठवला होता. संबंधीत ईमेल बंगाली भाषेत असल्याने म्हापसा पोलिसांनी अनुवादकाच्या मदतीने समजून घेत गुरुवारी भारतीय दंड संहितेच्या कलम ४५१, ३५४, ३७६ व गोवा बालहक्क कायद्याच्या कलम ८ आणि पोस्को कायद्याच्या कलम ६ आणि ८ नुसार गुन्हा नोंदवला होता. मात्र, संशयीत जलतरण प्रशिक्षक म्हापसा सोडून गेल्यामुळे त्याच्या शोधासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली तर उत्तर गोवा विभागीय अधिकारी गजानन प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक कपील नाईक आणि पोलिसांचे एक शोधपथक तयार करण्यात आहे.
हेही वाचा - औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
गोवा पोलिसांनी स्थानिक सर्व्हिलन्स आणि माहिती विभागाच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो अटक चुकवण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात सातत्याने प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवण्यात आली. त्याचा माग काढल्यानंतर तो दिल्लीतील काश्मीर गेट परिसरात असल्याचे आढळून आले. जेथून तो पुन्हा दूसरीकडे जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला तेथेच ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - ऐन गणेशोत्सवात तीन तलवारी व दोन चॉपरसह गुन्हेगाराला तळेगाव पोलिसांनी केले जेरबंद
ही घटना १४ मार्च ते २८ ऑगस्ट दरम्यान म्हापशात घडली. पीडित अल्पवयीन जलतरणपटू पालकांसह येथे भाड्याच्या घरात राहून म्हापशातील भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुरजित गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. तेव्हा पालक घरी नसताना तिच्या घरी जात जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी छेडछाड आणि लैंगिक अत्याचार करत होता. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पीडितेचे सरावामध्ये लक्ष नाही तसेच ती प्रशिक्षकाला टाळत असल्याचे पालकांच्या लक्षात आहे. जेव्हा त्याविषयी तिला विचारले तेव्हा तीने सर्व प्रकार त्यांच्यासमोर उघड केला. त्यानंतर पालकांनी तीला पश्चिम बंगाल मध्ये नेले. तेथे ३ ऑगस्ट रोजी तक्रार नोंद केली. तसेच गोवा पोलिसांना ईमेल पाठवला. त्याची दखल घेत गोवा जलतरण संघटनेने गांगुलीला तात्काळ बडतर्फ केले. तसेच केंद्रीय क्रीडामंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे.