पणजी - ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षासोबत युती करत मगोपाचे सुदिन ढवळीकर यांनी गोवा निवडणूक लढवली होती. मात्र वाऱ्याची बदलणारी दिशा पाहून ढवळीकर ममता दिदींना धक्का देत विनाशर्त भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. गेले कित्येक दिवस राज्यात सरकार स्थापनेसाठी 'किंगमेकर'ची भूमिका बजावण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) व गोवा फॉरवर्ड या दोन्ही प्रादेशिक पक्षांना निवडणूक निकालाने धक्काच दिला आहे. राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार नाही असे जनमत चाचणीत दाखवल्याने या दोन्ही पक्षांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांचा बेरंग झाला.
मगोने तृणमूल काँग्रेसशी युती करून १३ जागा लढविल्या होत्या. त्यांना ५-६ जागा जिंकण्याची आशा होती. त्यामुळे सरकार स्थापनेस त्यांची भूमिका महत्वाची ठरणार असे नेते सुदिन ढवळीकर यांना वाटत होते. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांनी गेले काही दिवस तशी भूमिकाही घेतली होती. पण आजच्या या निकालाने ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. गेल्या निवडणुकीत त्यांचे तीन आमदार निवडून आले होते. यंदा त्यांना २ जागांवरच समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी यावेळी तृणमूलच्या 'टार्गेट दिल्ली'ची घोषणा केली होती. बंगालमध्ये तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर खासदार अभिषेक बंदोपाध्याय यांना पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस बनवून बंगालबाहेर संघटनेचा विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी अभिषेक बॅनर्जी यांनी प्रथम त्रिपुरात पाऊल ठेवले आणि संघाला गोव्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु गोव्यात टीएमसीचा दारुण पराभव झाला. गोव्यात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी एकापेक्षा जास्त वेळा गोव्याचा दौरा केला आहे, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
तृणमूलने गोव्यात 26 जागा लढवल्या होत्या. यातील 15 जागांवर त्यांना रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत. पक्षाने 4 जागांवर दूसरा क्रमांक तर 3 जागांवर तिसरा क्रमांक गाठला. दोन जागांवर लोकांनी टीएमसीपेक्षा NOTA अर्थात वरीलपैकी काहीही नाही ला जास्त मते दिली. तृणमूलच्या प्रचारासाठी प्रशांत किशोर यांच्या IPAC कंपनीचे लोक अनेक महिन्यांपासून गोव्यात ठाण मांडून बसले होते. मात्र त्याचा तृणमूलला काहीच फायदा झालेला दिसत नाही. अनेक राज्यात IPAC ने आपली जादू दाखवली आहे. मात्र गोव्यात त्यांच्या पदरी निराशाच पडली. गोवेकरांनी तृणमूलला पूर्णपणे नाकारले आहे. गोवा विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने एकत्रित लढवली होती. तृणमूलच्या हाती काहीही लागले नसले तरी मगो पक्षाने 2 जागा जिंकल्या. दरम्यान गोव्यात ममता दिदींना त्यांच्या पक्षाने ज्या पक्षाशी मैत्री केली त्या मगोपने धोका दिला आहे. सुदिन ढवळीकर विनाशर्त भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत.