पणजी - जगभरात अडकलेल्या भारतीय खलाशांना स्वदेशी परत आणण्याचा मुद्दा तातडीने हाती घेतल्यामुळे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालय आणि एमईएचे आभार मानले आहेत. तसेच यामुळे खलाशांना मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही सांगितले. नाईक यांनी दि. 20 एप्रिल रोजी परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधर यांची भेट घेतली होती. तेव्हा गोवा आणि देशातील इतर भागात अडकलेल्या खलाशांच्या प्रश्नाविषयी चर्चा केली होती.
भारतीय किनारपट्टीवर दाखल झालेल्या बोटींसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी त्यांनी जहाजबांधणी मंत्री मनसूख मांडवीय आणि गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचीही भेट घेतली होती. नाईक यांनी दि. 13 मे रोजी पुन्हा एकदा परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची भेट घेतली. तेव्हा जगाच्या विविध भागात अडकलेल्या खलाशांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसओपी तयार करण्याची विनंती केली. त्याचवेळी गृहमंत्रालयाने सादर केलेल्या 'डीओ'चा विचार करत जलपर्यटन जहाजांवर अडकलेल्या खलाशांना भारतात परत पाठविण्यासंबंधी आदेश जारी केला.
सुमारे 7 हजार भारतीय खलाशी 'एमईए'च्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्यांना परत आणण्याची प्रयत्न सुरू झाले आहेत. दि. 5 मे 2020 च्या गृहमंत्रालयाच्या 'एसओपी'मध्ये भारताच्या मोहिमेद्वारे स्वदेशी उड्डाणात सामील करता येणे शक्य झाले आहे. समुद्रात अडकलेल्या सर्व खलाशांना परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. तसेच भारतीय किनाऱ्यापाशी असलेल्या जहाजावरील खलाशांना ' डी-बोर्ड' करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. नाईक यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि अधिकारी यांची वैयक्तिक भेट घेऊन खलाशांच्या कुटुंबीयांना वाटणारी चिंता व्यक्त केली.