पणजी - शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याविषयीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकुरकर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात पीक उत्पादकतेत सुधारणा, एकात्मिक कृषी व्यवस्थापन तथा बहुपीकपद्धती, यांत्रिकीकरण, बाजारपेठेची साखळी यावर भर दिला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचे देण्यात यावे, असे अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे डॉ. चाकुरकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल
भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये निरंतर संशोधन कार्य सुरू असते. अलिकडे संस्थेने भाताचे गोवा धन-1, गोवा धन-2, गोवा धन -3, गोवा धन-4 अशी वाणे विकसित केली आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांत काजूचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत. तसेच तांबडी भाजी, वांगी यांचेही नवीन वाण तयार करण्यात आले आहेत, असेही चाकुरकर म्हणाले. यावेळी हरियाणाहून 'हळदीचे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन' या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेत प्रथमच हळदीवर प्रक्रिया करण्यासाठीचे तंत्र उपलब्ध झाले आहे.