पणजी (गोवा) - कोरोना विषाणूच्या संक्रमणानंतर गोवा राज्यात म्युकरमायकोसिसने पहिला बळी घेतला. राज्यात या आजाराचे एकूण 6 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. दरम्यान, या आजारावर उपयुक्त ठरणाऱ्या अॅम्फोटेरिसिन-बी या इंजेक्शनची राज्यात मोठी कमतरता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी देखील गोव्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडल्याच्या बातमीला पुष्टी दिली.
हेही वाचा - Top 10 @ 3 PM : दुपारी तीनच्या ठळक बातम्या!
सहा रुग्णांवर सध्या जीएमसीमध्ये उपचार सुरू
गोव्यात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सहा रुग्णांना कोविड 19 उपचाराच्या वेळी म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळून आल्यानंतर अद्याप त्यांना घरी सोडण्यात आलेले नाही. या सर्व सहा रुग्णांवर सध्या जीएमसीमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले. तर, अॅम्फोटेरिसिन-बी या इंजेक्शनची कमतरता असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सोशल मीडियावर औषधांसाठी आवाहन करत आहेत.
मडगावमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी
राज्यातील मंडगावच्या होली स्पिरीट चर्चजवळील खासगी रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी म्हणजे 11 मे रोजी म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेला. त्यानंतर राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य सेवा संचालक डॉ. जोस डी यांनी दिली होती. या पहिल्या रुग्णाला अॅम्फोटेरिसिन-बी चे दोन डोस दिले गेले होते. परंतु, एका दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 12 मे रोजी दुसऱ्या रुग्णाचा म्युकरमायकोसिसचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णावर मडगावातील मलभाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमच्याकडे कोविड -19 पॉझिटिव्ह असलेला म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आहे. आम्ही शक्य तितके चांगले काम करत असल्याचे खासगी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी म्हंटले. नाक, डोळे, मेंदूत आणि सायनसमध्ये संसर्ग झालेल्या म्युकरमायकोसिसच्या संसर्गावर अनेक तज्ञ संशोधन करत आहेत.
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली पुष्टी
राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी देखील गोव्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडल्याच्या बातमीला पुष्टी दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडल्याचे समजले आहे. मी हे सांगू इच्छितो की डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील आमची टीम त्यांच्यावर सर्वोत्तम आणि योग्य उपचार करीत आहे. आम्ही देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याकडून या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेतले जात आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले.
हेही वाचा - जमिनीवर ठेवलेल्या रुग्णांना बेड कधी मिळणार, उच्च न्यायालयाचा गोवा सरकारला सवाल