पणजी - गोव्यात आयाराम गयाराम केलात तर गोव्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. गोव्यात सुरक्षित लोक असूनही आमदार इकडून तिकडे का पळतात हे समजत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हापसा येथे केले. म्हापसा विधानसभा पोटनिवडणूक उमेदवार जोशुआ डिसोझा आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांची संयुक्त प्रचारसभा म्हपसा टँक्सी स्टँडवर आयोजित करण्यात आली होती.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, जल, वायू प्रदूषण मुक्त गोवा निर्माण करणे हीच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची स्वप्नपूर्ती असेल. यासाठी आयाराम गयारामांना आळा घातला पाहिजे. याकरिता लोकांनी विचारपूर्वक आमदार निवडला पाहिजे. गोव्याच्या विकासाचे श्रेय येथील जनतेला जाते. मोठ्या मुश्किलीने गोव्यात स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लहानमोठ्या गोष्टींकडे दूर्लक्ष करा. दिल्ली सरकारने गोव्याच्या विकासासाठी दिलेले पंधरा हजार कोटी ही केवळ झलक होती.
यासभेसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मुलगे उत्पल पर्रीकर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना आपल्यावरील टिकेचा समाचार घेताना ते म्हणाले, मला राजकारणाचे बाळकडू सुरूवातीपासून मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना संरक्षण मंत्री केले ते गोव्याचे लोक त्यांच्यासोबत होते म्हणून. आम्ही आमचे वडील गोव्यासाठी दिले म्हणून आज भाजप हाच माझा परिवार आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेकडे हक्काने पाच 'कमळे' मागत आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, अंत्योदय आणि देशाच्या सुरक्षेसाठी भाजपता मते द्यावीत. यावेळी श्रीपाद नाईक, जोशुआ डिसोझा, म्हापसा महापौर रायन ब्रागांझा, माजी मुखमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल आदींनी मनोगत व्यक्त केले.