पणजी - चौदा वर्षीय लियोन मेंडोसा गोव्याचा दुसरा तर देशातील 67 वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर बनला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
उत्तर गोव्यातील साळगाव - बार्देश येथील लियोन आणि त्याचे वडील मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी होण्यापूर्वी युरोपध्ये एका स्पर्धेकरिता गेले होते. परंतु, तेव्हाच टाळेबंदी झाली आणि पितापुत्र तब्बल नऊ महिने तेथे अडकून पडले. या काळात निराश न होता लियोन याने आपले सर्व लक्ष्य बुद्धिबळावर केंद्रित केले होते. त्यानंतर या आठवड्यात तो इटलीमध्ये खेळविण्यात आलेल्या वर्गेनी चषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. सोबतच बुद्धिबळातील ग्रँडमास्टरचे नामांकन प्राप्त केले. या स्पर्धेत युक्रेनचा युकव विजेता ठरला.
ग्रँडमास्टर किताब मिळविणारा लियोन हा गोव्यातील दुसरा तर देशातील 67 वा बुद्धिबळपटू आहे. अनुराग म्हामल या गोव्यातील युवा बुद्धिबळपटूने पहिल्यांदा हे नामांकन प्राप्त केले आहे. लियोनच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे.