पणजी - गोव्यातील स्थानिक टॅक्सी चालकांचा अॅपमधून सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात पुन्हा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे या खासगी अॅप्सना गोवा पर्यटन महामंडळाची मान्यता आहे. मात्र, व्यवसाय धोक्यात आल्याचे आरोप करत टॅक्सी मालकांनी गोवा माईल्सच्या अनेक चालकांना धमक्या दिल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गावात गोवामाईल्सच्या टॅक्सीवर स्थानिक टॅक्सीमालकांनी दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत.
गोवामाईल्सचे प्रवक्ते जस्टीन न्यून्स म्हणाले, गोवामाईल्स या एजन्सीला गोवा पर्यटन महामंडळाची मान्यता आहे. तरी काही जणांचे हितसंबंध असल्याने ते टॅक्सीचालकांना अडचणीत आणत आहे. त्यामुळे पर्यटक निराश होत आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल अलेमॅवो यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी चालकांनी रिसॉर्टजवळ निदर्शने केली आहेत. तिथे गोवामाईल्सच्या टॅक्सींवर दगडफेक करण्यात आली. यावेळी टॅक्सी चालकांना वाहनातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले .
गोवामाईल्स टॅक्सीमुळे स्थानिक टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे चर्चिल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांना गोव्यामध्ये परवानगी देता येणार नाही, असेही ते म्हणाले. काही वर्षापूर्वी रशियन प्रवासी चालक आणि स्थानिक टॅक्सी मालकांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी खूनाची घटना घडल्यानंतर दुसऱ्याच वर्षी रशियन पर्यटकांची संख्या घटली होती. त्यामुळे सरकारी मान्यता असलेला अॅपचा पर्याय पुढे आला होता. त्यातून गोवामाईल्सची सेवा सुरू करण्यात आली.
दरवर्षी गोव्यात देशातील ७० लाख पर्यटक भेट देतात. टॅक्सी चालकाकडून आकारण्यात येणारे महागडे दर यामुळे पर्यटकांमधून नेहमी नाराजी व्यक्त करण्यात येते. ओलाचीही २०१४ मध्ये गोव्यात टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, स्थानिक टॅक्सी मालकांच्या आंदोलनांतर राज्य परिवहन विभागाने ओला कंपनीला टॅक्सी सेवा बंद करायला लावली होती.