पणजी (गोवा) - कोरोनाविरुद्ध लढा म्हणून १८ वर्षांवरील सर्व लोकांना लस देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या लसीकरणातून कोरोनाविरुद्ध मिशन सुरू करीत असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. या मिशनला गोव्यातील जनतेने सहकार्य करावे व स्वत:ला रोगप्रतिबंधक लस टोचण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
१८ ते ४४ वर्षांच्या दरम्यान सर्व लोकांना लस देण्याचे लक्ष्य
सावंत म्हणाले की, राज्य सरकारने यंदा ३० जुलै पर्यंत १८ ते ४४ वर्षांच्या दरम्यान सर्व लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री पणजी येथे पत्रकारांशी बोलत होते. लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व लोकांनी स्वत:ला रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यायची आहे. गोव्याने ३० जुलै २०२१ पर्यंत १८ ते ४४ वर्षांच्या दरम्यान संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे ते यावेळी म्हणाले.
गोवा ठरेल देशातील पहिले राज्य
गोवा देशातील शंभर टक्के १८ वर्षावरील लोकांसाठी लसीकरण करणारे असे पहिले राज्य व्हावे अशी माझी इच्छा आहे. राज्यात लसीकरण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुलांचे पालक, वेगवेगळे अपंग, सीफेअरर्स, मोटरसायकल टॅक्सी, टॅक्सी आणि रिक्षाचालक या लोकांना प्राधान्य दिले आहे. आम्ही दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांसाठी आणि गुरुवारी अल्पवयीन मुलांसाठी लसीकरण सुरू केले होते. मी आढावा घेतला असता मला आढळले की केवळ १ हजार ३०० लोकांना या वर्गवारीखाली लसी देण्यात आल्या आहेत. सावंत म्हणाले की, राज्य सरकारने आता पाच वर्षांच्या मुलांपर्यंत पालकांना संरक्षण देणाऱ्या प्राधान्य गटांतर्गत लसीकरणाची व्याप्ती वाढविली आहे, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.
कर्फ्यूबाबत ६ जून रोजी आढावा बैठक
गोवा राज्यात ७ जूनपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू सुरु आहे. हा कर्फ्यू उठणार कि पुढे असाच सुरु राहणार याबात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "कर्फ्यू सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी ६ जून रोजी आढावा बैठक घेणार आहोत. आम्ही कर्फ्यूचा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेऊ", असेही ते म्हणाले. दरम्यान सध्यातरी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार ठोस पावले उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.