पणजी- गोवा सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. गोवा शैक्षणिक हब बनत असताना लवकरच आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाणार आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल (गुरूवारी) पणजीत केले. दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था सभागृहात आयोजित मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
हेही वाचा- जनसामान्यांचा पक्ष मूठभरांचा करू नका, पंकजा मुंडेंचा भाजप राज्य नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष टोला
दोन दिवसाच्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागात नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे कचरा व्यवस्थापन तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकर लोबो, भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार डॉ. के. विजयराघवन, डॉ.अजयकुमार सूद, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, सागर विज्ञान संस्थेचे संचालक प्रा.सुनीलकुमार सिंग, राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार आणि जूझे म्यँन्युअल मनोरमा व्यासपीठावर उपस्थित होते.
विज्ञान महोत्सव पुढे कायम सुरू रहावा यासाठी गोवा सरकारने कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीअल रीसर्च आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्याशी सामंजस्य करार केले. ज्यावर अनुक्रमे राज्याचे मुख्य सचिव राय आणि हवालदार यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने तयार केलेल्या पर्रीकर यांच्यावर आधारित 'लीजेंड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणार-
यावेळी बोलताना डॉ. विजयराघवन म्हणाले, विज्ञान महोत्सव हा मार्गदर्शनासाठी चांगला पायंडा आहे. तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी गोव्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. या आधारे येथील नैसर्गिक स्रोत विकसित करण्यास मदत होईल.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उपयुक्त संशोधन-
उद्घाटन सत्रात प्रा. अजयकुमार सूद यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी 'निसर्ग हीच विज्ञानाची प्रेरणा, आपण समुहाने एकत्र का राहतो? याविषयावरील आपले संशोधन मांडले. समुह मानसिकता कशी घडते यासाठी चारवर्षांहून अधिक काळ त्यांनी संशोधन केले. या संदर्भातील मुंग्या, पक्षी, वन्यप्राणी यांची मानसिकता अभ्यासली. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी का होते या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकतात याचेही त्यांनी पावरपॉईंट सादरीकरण केले. तत्पूर्वी, मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान महोत्सव आयोजनाचा हेतू आणि पर्रीकर यांचा या संदर्भातील दृष्टीकोन स्पष्ट केला. यावेळी भाजप पदाधिकारी, उद्योजक आणि अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.