पणजी- केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आजपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु, या वाढत्या किमतीचा गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती व्यावसायिकांडून व्यक्त केली जात आहे.
खाण व्यवसाय बंद असल्यामुळे सध्या गोव्यात पर्यटन हाच मोठ्या प्रमाणात महसूल आणि रोजगार प्राप्त करून देणारा उद्योग आहे. परंतु, सततच्या वाढत्या करांमुळे त्यावर परिणाम जाणवू लागला आहे. गत हंगामात तर 50 टक्यांहून कमी पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे हॉटेल, टॅक्सी तसेच पर्यटनावर आधारित उद्योजकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यातच आता केंद्राने पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे या उद्योगाला याचा फटका निश्चित बसणार आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालावे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
नवीन दरपत्रक अजून प्रसारित झाले नसले तरी किंमतवाढ लागू झाली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 2 रूपये 32 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रतीलिटरसाठी 66.71 पैसे आकारले जात होते. तर आज 69.03 रुपये आकारले जात आहेत. गोव्यात पेट्रोलीयम पदार्थांसाठी ग्रीन सेस 0.5 टक्के आकारला जातो. तर व्हँट पेट्रोलवर 20 टक्के तर डिझेलवर 18 टक्के आकारला जातो.
कार्पोरेट क्षेत्राच्या लाभाचेच निर्णय सरकार घेत आहे
वाढत्या करवाढीविषयी नाराजी व्यक्त करत ट्रँव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सावियो मसाईस म्हणाले, सरकारने वाढविलेल्या करांमुळे पर्यटकांना मोठा खर्च करावा लागेल. त्यामुळे त्याचा फटका पर्यटनावर आधारित उद्योगांवर जाणवणार आहे. त्यामुळे या वाढत्या किंमतीमध्ये घट होणे आवश्यक आहे. तर नॉर्थ गोवा टुरिस्ट टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर म्हणाले, 2013 मध्ये सरकारने ठरवून दिलेल्या दरा प्रमाणे आम्ही सेवा देत आहोत. या किंमती कितीतरी वेळा वाढल्या. परंतु, सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. कार्पोरेट क्षेत्राच्या लाभाचेच निर्णय सरकार घेत आहे. मात्र, हे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे सरकार या किमती कमी करणार का? हा प्रश्न आहे.
मागील काही वर्षे इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल दर कमी होते. त्यामुळे तो कुतूहलाचा विषय बनला होता. गोव्यात येणारे पर्यटक जसा टॅक्सीचा वापर करतात. तसेच रेंट कार आणि रेंट बाईक यांचाही वापर मोठ्या प्रमाणात करून स्वतः गोवा फिरत असतात. त्यामुळे त्यावरही परिणाम होणार आहे.
खाणबंदीमुळे गोव्यातील रोजगार आणि महसूल या दोन्हीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर महसूल देणाऱ्या पर्यटन व्यवसायालाही गेल्यावर्षांपासून समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत वाढती कर वाढ येथील व्यवसाय वाढीच्या दृष्टीने किती लाभदायक आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.