पणजी - दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलीस नवनवीन युक्त्या शोधून काढत आहेत. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्यांनी चक्क सांताक्लॉज बनून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चॉकलेट आणि वाहतुकीचे धडे दिले.
हेही वाचा - 2019 : वर्षभरात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांकडून तब्बल 81 कोटींचा दंड वसूल
रस्ते अपघातामध्ये मुत्यूचे प्रमाण गोव्यात अधिक आहे. त्यामध्ये पर्यटकांची संख्या ही लक्षणीय आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा सरकार वाहतूक कायद्याच्या कडक अंमलबजावणी बरोबरच लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील दोन वर्षांपासून यामुळे अपघाती मृत्यूमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते आहे. परंतु, वाहतूक नियमांचे उल्लंघन होणे थांबलेले नाही. राजधानीतील रस्त्यावर वाहतूक सुरक्षेचे धडे देणारे सांताक्लॉज (वाहतूक पोलीस) कौतुकाचा विषय ठरले होते. पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना समजावत होते, तसेच चॉकलेटही देत होते.
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ब्रँडन डिसोझा म्हणाले, "हा उपक्रम म्हणजे केवळ चॉकलेट वाटण्यासाठी नव्हता, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहन चालवतानाचे नियम सांगण्याठी होता."
पोलिसांनी सांगितले, की वाहनचालक सुरक्षेकडे दूर्लक्ष करतात. दुचाकीस्वार विनाहेल्मेट आढळले, तर ज्यांनी हेल्मेट परिधान केले होते ते चांगल्या प्रतिचे नव्हते. काहींना हेल्मेटची पट्टी लावलेली नव्हती तर चारचाकी चालक सीट बेल्ट वापरत नसल्याचे आढळून आले.
हेही वाचा - बीड : चंदन सावरगाव जवळ भीषण अपघात; तीन ठार, 15 जखमी