पणजी - गोवा सरकारने सनबर्न(इलेक्ट्रॉनिक डान्स म्युजिक) फेस्टिवलच्या आयोजकांना दिलेली परवानगी अखेर मागे घेतली आहे. उत्तर गोव्यातील वागोटोर येथे २७ डिसेंबर महिन्यापासून तीन दिवसीय सनबर्न फेस्टिवलचे आयोजन होणार होते.
परवानगी दिल्याने झाली होती टीका -
गोव्यातील भाजपा सरकारने कोरोना महामारीच्या संकटातही सनबर्नला परवानगी दिल्याने चोहोबाजूने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काल (शुक्रवारी) गोवा काँग्रेसने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. गोव्यातील नागरिकांनी देखील सोशल मीडियावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अखेर परवानगी केली रद्द -
गोव्यातील कोरोना आणखी टळलेला नाही. मात्र, आयोजकांनी सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाचा धोका आणि नागरिकांचा विरोध पाहता गोवा सरकारने सनबर्न फेस्टिवलला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. काल सायंकाळी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी परवानगी मागे घेतल्याची घोषणा केली.