पणजी - स्वंतत्र भारतात राम मनोहर लोहिया यांच्याएवढी विद्यार्थी आंदोलने कोणी केली नसतील. त्यांच्याकडून आम्ही महात्मा गांधी यांच्याकडे पाहू लागलो. ते म्हणायचे, महात्मा गांधी यांची शारीरिक हत्या नथुराम गोडसेने तर आत्मिक हत्या गांधीजींच्याच वारसदारांनी केली. हेच चित्र आजच्या परिस्थितीतही दिसत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज पणजीत केले.
कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त संस्कृती भवनात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, गोवा विद्यापीठ कुलगुरु प्रा. वरूण सहानी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मलिक म्हणाले, गांधीजी हा खूप मोठा विषय आहे. व्याख्यानातील १०० श्रोते उठून गेले तरी न संपणार नाही. महात्मा गांधी यांचे वासरदार म्हणविणाऱ्यांनी त्यांना केवळ चरख्यापुरते मर्यादित करून टाकले. त्यांच्या सत्याग्रह या सर्वात मोठ्या अस्त्राकडेही दूर्लक्ष करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आजकाल एखादी व्यक्ती आमदार झाला तरी वेडा होईल की काय अशी वागते. साध्या साध्या यशांनी हरळून जाणाऱ्या राजकीय नेत्यांवरही त्यांनी टीका केली. सार्वजनिक जीवनाला गौतम बुद्धानंतर महात्मा गांधींनी पहिल्यांदा नितिमत्ता शिकवल्याचाही दाखला त्यांनी दिला. यासह गांधीजींच्या अनेक गुणांकडे राज्यपालांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरूदास पिळणकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अनेक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.