पणजी - भाजपाला शह देण्यासाठी त्यांच्या नाराज आमदारांना पक्षात घेऊन राज्यात भाजपा विरोधात मोट बांधणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार यांनी सांगितले. भाजपात नाराज असणाऱ्या 7 ते 8 आमदारांना घेऊन सत्ता काबीज करण्याचे मनसुबे काँग्रेस पक्षाने आखले आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युतीचे संकेतही चोदणकर यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत.
नाराज आमदार काँग्रेसच्या संपर्कात - चोदणकार
२०१९ला भाजपाने काँग्रेस पक्षातील आमदारांना घेऊन सत्तेचा तंबू उभारला. आमदारांनी लोकांना विकासाची खोटी स्वप्न दाखविली. मात्र, जसजशी निवडणूक जवळ येते त्याप्रमाणे भाजपाच्या स्वप्नाचा चुराडा होत चाललाय. काँग्रेस पक्षातून भाजपात गेलेल्या आमदारांना निवडून येण्याची शक्यताही मावळली गेली आहे. त्यामुळे या आमदारांनी बाहेरचा मार्ग धरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत भाजपाकडे आमदार शिल्लक राहणार नसल्याचे गिरीश चोदनकर यांनी सांगत भाजपाचे 7 / 8 नाराज आमदार आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
चोदणकरांनी लोबोवर बोलणे टाळले -
मागच्या काही दिवसांपासून भाजपाचे मंत्री व नाराज आमदार मायकल लोबो काँग्रेसच्या गोटात वावरत आहेत. सोबत ते काँग्रेसच्या स्थानिक संभाव्य उमेदवारांना आपल्या सोबत व्यासपीठावर आणून भविष्यातील संकेत देत आहेत. या बाबत चोदणकार यांना पत्रकारांनी विचारले असता लोबो यांच्या मनात काय चालले हे मी ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेसची युती होणार -
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेस युती करणार असल्याचेही गिरीश चोदणकार यांनी सांगत त्याविषयी दिल्लीत व राज्यात सकारात्मक बोलणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Nawab Malik on ETV Bharat : अन्यायाविरोधात लढण्याची हीच ती योग्य वेळ - नवाब मलिक