पणजी - कर्नाटक निवडणुकीतील भाजपच्या यशाचे मानकरी भाजपचे नेते अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आहे, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लगावला आहे. आज (गुरूवारी) येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याच बरोबर त्यांनी सावंत यांच्यावर निशाणाही साधला आहे.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री गोव्याच्या जनतेला मुर्ख समजून फसवणूक करत असतात. आम्ही त्यांचा निषेध करतो. राज्यात मुंडकार कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी 1 वर्ष आधी विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांचा जन्म झाला आहे. तरीदेखील त्यांनी मुंडकार कायद्याखाली अर्ज कसा केला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सर्वसामान्य मुंडकार लोकांच्या सुमारे 4 हजारांहून याचिका अथवा तक्रारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयात अशांना 3 महिन्यात 1 तारीख देण्यात येते. तर मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात तीन वेळा हा कुठला न्याय ? असे करण्यासाठी प्रशासनावर दबाव आहे का ? मुंडकार कायद्यातील पळवाटा शोधून सरकारी तिजोरीची वाट अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? असे सवालही त्यांनी या पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थित केले.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा
या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: मुख्यमंत्री सावंत यांनी द्यावे. तसेच राज्यतील अन्य मुंडकारांच्या तक्रारी लवकरात लवकर निकाली काढून त्यांना सुखाने जगू द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली. अलिकडे केंद्राने 15 वित्त आयोगाचा आर्थिक अहवाल सादर केला. या संदर्भातील एकही बैठक राज्यात झाली नाही. याबद्दल बोलताना ते म्हणाले, वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतरचा हा पहिलाच अहवाल असल्यामुळे महत्त्वाचा होता. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेले राज्याचे मुख्य सचिव यांना जाब विचारण्यात येईल.