पणजी - गोवा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या 10 आमदारांनी 10 जुलै, 2019 ला भाजपात प्रवेश केला होता. त्याविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 4 जाने., 2021) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा खटला आपणच जिंकू, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून गोव्यातील मतदारांना न्याय मिळण्याची आशा आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी गोवा काँग्रेसने केली होती. त्यावर दि. 4 जानेवारी, 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी न्याय होईल, असा विश्वास गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या ट्वीट करत व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण..?
2017 मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले होते. पण, बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा जुळवता न आल्याने त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्यानंतर वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी तत्काळ काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत भाजपप्रवेश करत मंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर झालेल्या झालेल्या पोटनिवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले. त्यानंतर दि. 10 जुलै, 2019 रोजी नाट्यमय घडामोडीत तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मंत्रीपदे आणि अन्य मोक्याच्या जागा मिळाल्या. यावर नाराज काँग्रेसने आक्षेप घेत हा मतदारांचा अपमान आहे, असे म्हणत न्यायालयात धाव घेतली होती.
गोमंतकीयांना न्याय मिळेल - चोडणकर
दि. 8 ऑगस्ट 2019 मध्ये गोवा विधानसभा सभापती यांच्यासमोर याचिका सादर केली. त्यानंतर 6 जून, 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. याबाबत 2 जून, 2019 पासून 12 वेळा सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक यांच्याशी संपर्क साधला. तर 19 वेळा पटलावर येऊनही सुनावणी होऊ शकली नव्हती. आता 4 जानेवारी, 2021 सुनावणी होऊन गोमंतकीयांना न्याय मिळेल, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बारावी आणि अन्य वर्गांच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा गोवा सरकारचा विचार
हेही वाचा - गोवा विधानसभेचे अधिवेशन 25 जानेवारीपासून सुरू